पैठण, : (प्रतिनिधी) : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, अंतर्गत सुरू असलेल्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या फळबागांचे कृषी विभागामार्फत मूल्यांकन करण्यात आले होते. सदरील कामे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सध्या प्रगतीपथावर आहेत.
या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनानुसार योग्य मोबदला मिळावा, यासाठी आमदार विलास भुमरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. रविवारी ९ ऑगस्ट रोजी एकूण ३५ शेतकऱ्यांना कृषी मूल्यांकनाच्या मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात आले.
खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा, दावरवाडी आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांना हा मोबदला धनादेशाच्या स्वरूपात देण्यात आला. यावेळी कृषी विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी योगेश परदेशी व अमित जठार यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्काचा मोबदला देण्यासाठी आमदार मिळवून विलास भुमरे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेतीला शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासोबतच बाधित शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्नही प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.













